एक संशयित ताब्यात; पोलिसांचा तपास वेगात
साईमत पाळधी प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी पहाटे एका ३५ वर्षीय मजुराचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दारुड्यांमधील वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
पिंटू आमशा बारेला (वय ३५, रा. बरेली, जि. बडवानी, मध्यप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो रेल्वे रुळांवर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोमवारी (दि. २३ मार्च) पहाटे सुमारे दीड वाजेच्या सुमारास रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाळधी स्थानकाजवळ एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी तातडीने याची माहिती पाळधी दूरक्षेत्र पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला.
मृतदेहाची तपासणी करताना पिंटू बारेला यांच्या डोक्यावर, हातांवर व शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या. प्राथमिक तपासात दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीने टणक वस्तूने डोक्यावर वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न होत आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली असून, एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, मयताच्या पत्नी सखुबाई बारेला यांच्या फिर्यादीवरून पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
