साईमत / जळगाव / प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)–नागपूर तसेच पुणे–नागपूर या मार्गांवर या विशेष सेवा चालवण्यात येणार असून जळगाव आणि भुसावळ स्थानकांवरही थांबे देण्यात आले आहेत.
एलटीटी–नागपूर विशेष गाडी (क्र. ०१०२१) ही ३ एप्रिल रोजी पहाटे १२.५५ वाजता एलटीटी येथून सुटून त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. परतीची नागपूर–एलटीटी गाडी (क्र. ०१०२२) ही ३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता एलटीटी येथे येईल.
या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत. गाडीची रचना १ एसी द्वितीय, ६ एसी तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि १ गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल.
दरम्यान, पुणे–नागपूर मार्गावरही दोन विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे–नागपूर विशेष (क्र. ०१४६७) ही ३ एप्रिल रोजी दुपारी ३.५० वाजता पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. नागपूर–पुणे विशेष (क्र. ०१४६८) ही ४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता नागपूरहून सुटून त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात दाखल होईल.
या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत. या सेवेची रचना २ एसी द्वितीय, ४ एसी तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि १ सामान्य श्रेणी अशी असेल.
या विशेष गाड्यांमुळे नागपूरकडे जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोयही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
