राष्ट्रवादीकडे राहणार महिला आयोगाचे अध्यक्षपद?
साईमत मुंबई प्रतिनिधी
रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून आपला राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय व महिला अधिकार मंडळांमध्ये मोठी हलचाल उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यापाठीमागील पार्श्वभूमी म्हणून भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यावर सुरू असलेली गंभीर घोटाळ्यांची चर्चा व आरोप प्रमुख आहेत.
फेब्रुवारी महिन्यात अशोक खरात यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानंतर, त्यांच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो सोशल मीडियावर फिरू लागल्याने प्रकरणाची गंभीरता उघडकीस आली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीविषयीही प्रश्न उपस्थित झाले. विविध धार्मिक कार्यक्रमांत अशोक खरातसोबत दिसलेल्या फोटोच्या माध्यमातून विरोधकांनी चाकणकर यांना निशाणा साधला. वाढत्या राजकीय दबावामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला.
चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जागा कोणाला दिली जाईल, यावर जोरदार राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सुरुवातीला हे पद दुसऱ्या पक्षाकडे जाणार की नाही, अशी चर्चा होती; मात्र प्राथमिक माहितीनुसार हे पद पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नव्या अध्यक्षासाठी पुण्यातून वैषाली नागवडे यांचं नाव चर्चेत आहे. अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून, लवकरच या बद्दल अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर कोण ठरतो, याकडे सर्व राजकीय पक्ष आणि समाजाचे लक्ष लागले आहे.
