महिलांसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन लोकार्पित
साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन शनिवारी (२१ मार्च) उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
सकाळी साडे-दहा वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातून झाली. त्यानंतर महापालिकेच्या प्रांगणातील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापती सिंधूताई कोल्हे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सभागृह नेते नितीन लढ्ढा आणि इतर उपस्थित नगरसेवक व अधिकाऱ्यांनी आदरांजली अर्पण केली.
स्थापना दिनाच्या औचित्याने महिलांच्या आरोग्याचा विचार करत महापालिकेत सॅनिटरी वेंडिंग मशीन बसविण्यात आले. या अभिनव सुविधेचे लोकार्पण महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सिंधूताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेच्या सहाव्या मजल्यावरील महिला व बालकल्याण विभागाजवळ उभारलेल्या या मशीनमुळे महिला कर्मचारी तसेच येणाऱ्या अभ्यागतांना मोठा दिलासा मिळणार आहे. नगरसेविका आणि महिला अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाचे कौतुक केले.
स्थापना दिनानिमित्त महापालिकेच्या प्रांगणात रांगोळी, फुलांची सजावट तसेच प्रवेशद्वाराजवळ फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे परिसर उत्सवमय झाला होता.
या सोहळ्यात महापालिकेतील विविध विभागांचे प्रमुख, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दरम्यान महानगरपालिकेच्या प्रगतीचा आढावा घेत शहराच्या विकासासाठी एकात्मता, सेवा आणि प्रगतीचा संदेश देत संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
