मुख्यमंत्र्यांकडून निर्देश; फोटो आणि व्हिडिओनंतर वाढला दबाव
साईमत नाशिक प्रतिनिधी
ज्योतिषी अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असताना, या प्रकरणाचे पडसाद आता राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत असून, त्यांच्या पदावर गच्छंती निश्चित मानली जात आहे.
नाशिकमध्ये एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येऊ लागल्या. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या दृश्यांमुळे जनतेत संतापाची लाट उसळली असून, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती.
या प्रकरणामुळे महिला आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही आरोप होत आहेत. आयोगाच्या अध्यक्षा पदावर असलेल्या व्यक्तीचा अशा वादग्रस्त व्यक्तीसोबत संबंध आल्याने, संवेदनशील प्रकरणांमध्ये हस्तक्षेप होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती समोर आल्याने, चाकणकर यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, अशोक खरात प्रकरणाने केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर प्रशासन आणि राजकीय व्यवस्थेलाही हादरा दिला असून, येत्या काही दिवसांत आणखी मोठे निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
