साईमत जळगाव प्रतिनिधी
तालुक्यातील निमखेडी गावात शुक्रवारी (दि. १९ मार्च) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडलेली घटना परिसरात एकच खळबळ उडवून दिली. कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीवर लोखंडी विळ्याने वार करून तिची निर्घृण हत्या केली. मयत महिलेचे नाव दिपाली नितीन सोनवणे (वय २८, रा. निमखेडी, ता. जळगाव) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिपाली सोनवणे आपल्या पती नितीन विजय सोनवणे (वय ३५) व दोन मुलं आणि एक मुलगी यांच्यासह वास्तव्यास होत्या. नितीन सोनवणे हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत कौटुंबिक वाद होत होते.
शुक्रवारी दुपारी पुन्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाच्या भरात संतापलेल्या नितीन सोनवणे यांनी लोखंडी विळ्याने पत्नीच्या मानेवर व पोटावर वार केले. या हल्ल्यात दिपाली गंभीर जखमी झाल्या आणि घटनास्थळीच त्यांच्या मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी नितीन सोनवणे स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला.
मृत महिलेच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार असून, या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सावधानता आणि समाज संदेश: कौटुंबिक वादातून हिंसा घडू नये, तसेच तणावग्रस्त परिस्थितीत त्वरित पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, ही घटना समाजासाठी गंभीर चेतावणी आहे.
