साईमत / अलिबाग / प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यात २००४ साली घडलेल्या खूनप्रकरणातील तब्बल २१ वर्षे फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोयनाड पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पनवेल येथून मनोज अशोक पांडव याला अटक केली.
घटनेनुसार, घेरासागरगड वडवली येथे आरोपी मनोज पांडव याची बकरी गणेश ठाकूर यांच्या आवारात मृतावस्थेत आढळली होती. ही बकरी प्रसाद ठाकूर यांनी मारल्याचा संशय मनोज पांडव याला होता. या कारणावरून त्याने न्यायालयातही तक्रार दाखल केली होती. या वादातून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले.
याच रागातून २ एप्रिल २००४ रोजी रात्रीच्या सुमारास मनोज पांडव याने प्रसाद ठाकूर यांना एकटे गाठून धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून केला. या प्रकरणी गणेश ठाकूर यांच्या फिर्यादीवरून पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणातील दुसरा आरोपी जयप्रकाश उर्फ जयेश म्हात्रे (रा. उसर्ली) याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र मुख्य आरोपी मनोज पांडव दीर्घकाळ फरार होता.
पोलीसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने त्याचा माग काढत पनवेल येथील त्याच्या निवासस्थानावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, हवालदार मंगेश लांगी, राकेश मेहतर आणि शिपाई किशोर चव्हाण यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास सुरू आहे.
