साईमत / जालना / प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून, गुरुवार (१९ मार्च) रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, तसेच झाडे, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि उंच इमारतींपासून दूर राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे. मेघगर्जना होत असताना मोकळ्या जागेत किंवा झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. तसेच, विजांचा कडकडाट सुरू असताना घरातील विद्युत उपकरणांचा वापर टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करताना कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावे, पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. वाहनचालकांनीही पावसात वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करावे, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गव्हाचे पीक सध्या कापणीच्या टप्प्यात असल्याने या अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गुरुवारी गुढी पाडव्याचा सण असल्याने कृषी परंपरांनुसार नव्या सालगडीची नियुक्ती केली जाते. मात्र, याच काळात कापणीची घाई करावी लागणार असल्याने हार्वेस्टरची उपलब्धता हा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
पीक भिजल्यास बाजारभाव घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा गव्हाचे दर आधीच मर्यादित असून शेतकऱ्यांना २२०० ते २४०० रुपये दर मिळत आहेत, तर बाजार समितीत दर २६०० ते २८०० रुपयांपर्यंत आहेत. अशा परिस्थितीत अवकाळी पावसामुळे दर आणखी घसरण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
