साईमत/ धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव-लातूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर करजखेडा पाटीजवळ रविवारी भीषण तिहेरी अपघात घडून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या तीन कार एकमेकांवर आदळल्याने झालेल्या या अपघातात तिन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला दिसून आला.
प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो ही कार अतिवेगाने धावत होती. करजखेडा पाटीजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बोलेरोने समोरील वॅगनार कारला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की बोलेरो गाडी पलटी होऊन दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या होंडा सिटी कारने बोलेरोला धडक दिल्याने तिहेरी अपघात घडला.
या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनांमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. तसेच चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी धाराशिव व सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
