भरदिवसा वरणगावात लोखंडी रॉडने हल्ला पोलिस तपास सुरू
साईमत/वरणगाव/ प्रतिनिधी –
वरणगाव शहरातील हॉटेल आस्वाद परिसरात सकाळी १० वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. अज्ञात हल्लेखोराने ६५ वर्षीय ज्ञानेश्वर भोई (रा. भोईवाडा, वरणगाव) यांच्यावर अचानक लोखंडी रॉडने जोरदार वार केला. या हल्ल्यात भोई गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, भोई हे हॉटेल आस्वाद परिसरातून जात असताना अचानक हल्लेखोराने त्यांच्यावर लोखंडी रॉडने वार केला. या हल्ल्यात त्यांचे डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला. हल्ल्यानंतर भोई रस्त्यावरच कोसळले. परिसरातील नागरिकांनी हे पाहताच तातडीने मदतीस धाव घेत जखमी भोई यांना जवळच्या रुग्णालयात हलवले.
भरदिवसा घडलेल्या या घटनेने वरणगाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अलीकडील काळात परिसरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात आरोपीच्या शोधकार्याला सुरुवात केली असून तपास सुरू असल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये सावधगिरी आणि चिंता वाढली असून, नागरिकांना रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
