धावत्या ट्रकला भीषण आग मालसामान जळून खाक
साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी
जामनेर–भुसावळ महामार्गावर शुक्रवारी (दि. १३) दुपारी धावत्या आयशर ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कुऱ्हे पानाचे गावाजवळील देवेंद्र हॉटेलसमोर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ट्रकमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, केमिकलचे ड्रम, सल्फ्युरिक ॲसिडसारखा ज्वालाग्राही साठा तसेच विद्युत पंप असल्याने मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त होत होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकसह त्यातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरकडून भुसावळच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेला आयशर ट्रक दुपारी सुमारे साडेबारा वाजता कुऱ्हे पानाचे गावाजवळील देवेंद्र हॉटेलसमोर पोहोचला असता ट्रकच्या केबिनच्या खालच्या भागातून अचानक धूर निघू लागला. चालकाच्या लक्षात येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. काही क्षणांतच संपूर्ण ट्रक पेट घेतल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली.
दरम्यान, ट्रकमध्ये ऑक्सिजन सिलेंडर आणि सल्फ्युरिक ॲसिडसारखे धोकादायक रसायन असल्याने सिलेंडरचा स्फोट होण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तत्काळ थांबविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलासह परिसरातील काही कंपन्यांचे असे एकूण पाच ते सहा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले आणि संभाव्य मोठा अनर्थ टाळला.
या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक तरुणांच्या मदतीने अडकलेली वाहतूक हळूहळू सुरळीत केली.
दरम्यान, ट्रकला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
