गावठी कट्ट्याने दोन राऊंड फायर केले कोणालाही इजा नाही, पण शहरात घाबरलेले वातावरण
साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी
शहरातील गुन्हेगारीचे स्वरूप पुन्हा एकदा उघड झाले असून, मंगळवारी दुपारी वाल्मिक नगरातील घरकुल चौकात संतप्त भावनेतून एकतरुणाने दोन राऊंड गोळ्या झाडल्या. सुदैवाने, या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक नगरातील श्रीराम चौकाजवळ राहणारे रसाल राठोड (वय ४८) हे नेरीनाका स्मशानभूमी परिसरातून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. हल्ल्यात त्यांचा हात गंभीरपणे जखमी झाला. राठोड यांनी लगेचच आपला मुलगा अनिल राठोड याला ही घटना सांगितली.
वडिलांना मारहाणी झाल्याची माहिती मिळताच संतप्त अनिल राठोड संशयितांच्या शोधात निघाला. घरकुल चौकात त्याला वडिलांना मारहाण करणारे तिघे जण बसलेले दिसले. काही क्षणांतच अनिलने आपल्या दुचाकीला वळवून, कमरपट्टीत लावलेल्या गावठी कट्ट्यातून त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दोन्ही गटातील संशयितांची धरपकड सुरू केली. या प्रक्रियेत मारहाण करणाऱ्या गटातील प्रशांत चौधरी आणि हिमांशू सांखला यांना ताब्यात घेतले गेले, तर दुसऱ्या गटातील सुनील राठोड यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मुख्य आरोपी अनिल राठोड घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेमुळे जळगाव शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
