मुख्य मार्गांचे काँक्रिटीकरण होणार; जळगावसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात जळगाव शहरासाठी तब्बल २२.५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार असून नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या निधीची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जळगाव शहरातील विकासकामांना गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत शहरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या असून अनेक महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या निधीतून शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये शिवकॉलनी – वाघनगर – गाडगेबाबा चौक (१०० फुटी रस्ता) या मार्गाचे काँक्रिटीकरण, टॉवर चौक – नेहरू चौक – मनपा रस्ता यांचे काँक्रिटीकरण तसेच हायवे समांतर रस्त्याच्या उर्वरित कामांची पूर्तता करण्यात येणार आहे. या कामांमुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल तसेच नागरिकांना अधिक सुरक्षित व सुलभ प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
या विकासकामांमुळे जळगाव शहराच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार असून भविष्यातील विकासासाठीही नवे मार्ग खुली होतील, असा विश्वास आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जळगाव शहरासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनित्रा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.
नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले हे रस्ते लवकरच दर्जेदार काँक्रिट रस्त्यांमध्ये रूपांतरित होणार असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
