सरोगेट एजंट म्हणून काम केल्याचा आरोप; रॅकेटमागील साखळी उलगडण्यास तपास यंत्रणा सज्ज
साईमत नाशिक प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज अवैध विक्री प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले असून, या प्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी नाशिकमधील ‘मालती आयव्हीएफ सेंटर’चे संचालक डॉ. अमोल पाटील यांना अटक केली आहे. बदलापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. आज (बुधवारी) त्यांना कल्याण सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
अनेक वेळा स्त्रीबीज काढल्याने रॅकेट उघड
बदलापूर येथे एका महिलेकडून एकदा नव्हे तर अनेक वेळा स्त्रीबीज काढण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर अवैध विक्रीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय निर्माण झाला होता. या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली होती. तपासादरम्यान मिळालेल्या कागदपत्रांमधून या व्यवहाराचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
नाशिक महानगरपालिकेची तपासणी, नोटीस बजावली
या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबई नाका परिसरातील ‘मालती आयव्हीएफ सेंटर’ची सखोल तपासणी केली. काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून, बदलापूर येथे सापडलेल्या कागदपत्रांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी संबंधित केंद्राला नोटीस बजावण्यात आली होती.
सरोगेट एजंट म्हणून काम केल्याचा आरोप
तपास पुढे सरकत असताना डॉ. अमोल पाटील यांच्यावर सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप समोर आला आहे. बदलापूर पोलिसांनी त्यांना अटक करून पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या अटकेनंतर नाशिकमधील त्यांच्या ‘मालती आयव्हीएफ सेंटर’वर कारवाईची टांगती तलवार आहे.
गरजू महिलांना आमिष; रॅकेटचा विस्तार
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, आयव्हीएफ सेंटरच्या नावाखाली गरजू महिलांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून या रॅकेटमध्ये ओढले जात असल्याचा संशय आहे. स्त्रीबीज अवैधरित्या काढून त्याची विक्री केल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात येत आहे. हे संपूर्ण जाळे बदलापूर येथून नियंत्रित होत असल्याचेही समोर येत आहे.
तपासाचा वेग वाढला
डॉ. पाटील यांच्या अटकेनंतर या रॅकेटमागील इतर साखळ्या उलगडण्यावर तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि सहभागी व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.
या प्रकरणामुळे राज्यातील आयव्हीएफ केंद्रांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. पुढील काही दिवसांत या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
