पोलिसांवरही दगडफेक; वाहन जप्त, गुरे गोशाळेत दाखल
साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात अवैध गुरे वाहतूक प्रकरणावरून निर्माण झालेल्या तणावात थार गाडीची तोडफोड करत दोन तरुणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी संबंधित वाहन जप्त करत पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुणांनी रात्री मास्टर कॉलनी परिसरात गुरांची वाहतूक करणारी एक गाडी अडवली. अवैध तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी विरोध केला. यानंतर गुरांची वाहतूक करणारे आणि विरोध करणारे तरुण यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. संतप्त जमावाने थार गाडीची तोडफोड करत दोन तरुणांना मारहाण केली, अशी माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस कारवाईसाठी पोहोचताच काही संतप्त तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत गुरांची वाहतूक करणारे वाहन जप्त केले. वाहनातील गुरांना गोशाळेत दाखल करण्यात आले असून, त्यांची तपासणी करण्यात येत आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधितांचा शोध घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.
पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सांगितले की, “घटनेची सखोल चौकशी सुरू असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
प्रत्यक्षदर्शी रोशन सोनवणे, नागरिक धवल चौधरी आणि गाडीचे नुकसानग्रस्त मालक हरीश पाटील यांनीही घटनेविषयी माहिती दिली असून, परिसरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, अवैध गुरे वाहतूक आणि त्यावरून उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
