वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव शहरातील आशाबाबा नगर परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत बंद घर फोडून तब्बल ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोपाळ दिनकर चौधरी (वय ५१, रा. आशाबाबा नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून हॉटेल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ३ मार्च रोजी रात्री साडेबारा ते पहाटे दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात कोणतीही परवानगी न घेता प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ करताना चोरट्याने बाहेर उभी असलेली दुचाकीही पळवून नेली.
चोरीत सुमारे ३५ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच (एमएच १९ बीवाय ११४५) क्रमांकाची दुचाकी असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत. दरम्यान, परिसरात अलीकडील काळात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
