महानगरपालिकेच्या यंत्रसामग्रीत भर; नगरपालिकेची क्षमता वाढली
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहराच्या स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्थापन कार्यात मोठा टप्पा घेऊन महानगरपालिकेच्या ताफ्यात सोमवारी नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे लोकार्पण उत्साहात पार पडले. यामध्ये अग्निशमन विभागासाठी दोन उच्च क्षमतावाले वाहन आणि आरोग्य विभागासाठी तीन नवीन जेसीबी वाहनांचा समावेश आहे.
जेसीबी वाहनांचे लोकार्पण महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते आकाशवाणी चौकात करण्यात आले. लोकार्पणानंतर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वेस्ट मटेरियल उचलण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. महापौर काळे यांनी सांगितले की, “या यंत्रसामग्रीच्या मदतीने महामार्गाची स्वच्छता नियमित आणि चकाचक राखणे सोपे होईल.”
नवीन जेसीबी वाहनांच्या मदतीने महामार्गावरील कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून लगेचच साफसफाईस सुरुवात झाली असून, महानगरपालिकेने दुतर्फा स्वच्छतेसाठी ठोस योजना आखली आहे.
याचसोबत अग्निशमन दलाच्या ताफ्यातही महत्त्वाची भर घातली गेली आहे. यापूर्वी दाखल झालेल्या सहा प्रभावी वाहनांमध्ये आता आणखी दोन हायटेक वाहनांचा समावेश आहे. यापैकी वॉटर ब्राऊजर वाहनाची पाणी साठवण क्षमता १२ हजार लिटर असून, दोन सामान्य अग्निशमन वाहनांइतके पाणी एका वाहनात साठवता येते. तसेच अॅडव्हान्स मल्टीपर्पज फाउंटन मशीनच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीत कमी वेळेत आग विझविणे शक्य होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यात भाजप गटनेता प्रकाश बालाणी, शिवसेना शिंदे गटचे गटनेता विष्णू भंगाळे, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेता इब्राहिम पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटनेता प्रफुल्ल देवकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, अग्निशमन अधिकारी भारत बारी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी महापौर नितीन लढ्ढा आणि अनेक नगरसेवकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
या नवीन यंत्रसामग्रीच्या मदतीने जळगाव महानगरपालिकेने केवळ स्वच्छतेमध्ये नवचैतन्य निर्माण केले नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने प्रतिसाद देण्याची क्षमताही बळकट केली आहे.
