आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीसांत गुन्हा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील मेहरूण परिसरात एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) दुपारी घडली. या प्रकरणी संबंधित तरुणीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे, जळगाव येथे संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहरूण परिसरात कुटुंबियांसह वास्तव्यास असलेली १९ वर्षीय तरुणी शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजता श्रीराम मंदिर चौकातील आपल्या आजीच्या घरी गेली होती. गच्चीवर पापड वाळत घालत असताना, त्याच परिसरात राहणारा संशयित आरोपी भावेश भानुदास पाटील (रा. मेहरूण) तेथे आला.
दरम्यान, त्याने तरुणीचा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी प्रचंड घाबरली. प्रसंगावधान राखत तिने तत्काळ कुटुंबियांना माहिती दिली आणि थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावे, जेणेकरून आरोपींवर त्वरित कायदेशीर कारवाई करता येईल.
