महिला उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘खान्देश महोत्सव’ एक आदर्श व्यासपीठ
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेच्या व महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘खान्देश महोत्सव २०२६’ उद्यापासून सागर पार्कमध्ये उत्साहात सुरू होणार आहे. महापौर दीपमाला काळे यांनी जळगावकरांना आवाहन केले आहे की, कुटुंबासह या महोत्सवाला भेट देऊन स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना पाठबळ द्यावे.
‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे. महोत्सवाचा मुख्य उद्देश स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.
या सहाव्या वर्षी आयोजित होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी ६ वाजता राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार उज्ज्वल निकम, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवात खान्देशाच्या समृद्ध संस्कृतीचे, परंपरेचे आणि खाद्यवैविध्याचे दर्शन घडणार आहे. एकूण १८० स्टॉल्स उभारण्यात आले असून, महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, घरगुती उपयोगाच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, सजावटीच्या वस्तू तसेच खान्देशी पारंपरिक शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ नागरिकांसाठी उपलब्ध असतील. या स्टॉल्समुळे स्थानिक उत्पादकांना थेट ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते ओम यादव यांच्या उपस्थितीत महिलांसाठी विशेष स्पर्धा होणार असून, विजेत्यांना पैठणी, राणीहार आणि आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच स्थानिक गायक, नृत्य गट, लहान मुलांसाठी गेम झोन आणि जादूगाराचे प्रयोग यामुळे महोत्सवात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. नागरिकांनी महोत्सवाला भेट देऊन स्थानिक उत्पादनांची खरेदी करावी आणि महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
