एसपींच्या आदेशानंतर दुकाने रात्रीही उघडी ठेवता येणार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जिल्ह्यातील हॉटेल्स, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना आता २४ तास सुरू ठेवण्याच्या नियमाबाबतचे संभ्रम प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर दूर झाले आहेत. राज्य शासनाने मद्यविक्री व्यतिरिक्त सर्व दुकानांना २४ तास व्यवसाय करण्यास परवानगी दिली असून, तरीही जिल्ह्यात अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने होत नसल्याचे आढळले. रात्री १० नंतर दुकाने उघडी ठेवल्यामुळे काही व्यापाऱ्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
प्रशासनाने हस्तक्षेप केला
व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला. सहायक कामगार आयुक्तांनी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना लेखी पत्राद्वारे नियमाची आठवण करून दिली. त्यानंतर एसपींनी सर्व पोलिस ठाण्यांना स्पष्ट सूचना जारी केल्या. “विनाकारण दुकाने बंद करण्यास सक्ती करू नये”, असे आदेश दिले गेले. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता जिल्ह्यात नियमांची अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्यापाऱ्यांचा आवाज
नाथजानकी फाउंडेशनचे हर्षल सिखवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेत सहायक कामगार आयुक्तांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.
काय आहेत नियम
दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ नुसार, ज्या दुकानांकडे वैध शॉप अॅक्ट परवाना आहे आणि १० पेक्षा कमी कामगार आहेत, अशा दुकानांना २४ तास सुरू ठेवण्यास शासनाची परवानगी आहे. मद्य विक्रीची दुकाने व आस्थापना (परमिट रुम, बिअरबार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक व इतर मद्य विक्री करणाऱ्या ठिकाणांसह) २४ तास सुरु ठेवता येणार नाहीत.
या स्पष्ट मार्गदर्शनामुळे आता जळगावातील व्यावसायिक आस्थापना रात्रीच्या वेळीही नियमांनुसार व्यवसाय करू शकतील, आणि व्यापाऱ्यांना अनावश्यक पोलिस कारवाईपासून संरक्षण मिळाले आहे.
