आरोग्य, पाणी व पथदिव्यांवरून प्रशासनाला धारेवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दालनात बुधवारी (दि. १८) प्रभाग क्रमांक १३ मधील प्रलंबित प्रश्न आणि तक्रारींवर विशेष बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवकांनी आरोग्य, पाणीपुरवठा आणि पथदिवे या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाला जाब विचारत समस्यांचा पाढाच वाचला. नागरिकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेत महापौर दीपमाला काळे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत पुढील आठ दिवसांत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. “यापुढे तक्रारी येता कामा नयेत; अन्यथा कारवाईचा विचार केला जाईल,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्य विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नगरसेविका सुरेखा तायडे यांनी घंटागाडीच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करत “घंटागाडीचे चालक कोण आहेत, त्यांचे मार्ग काय आहेत, याची सविस्तर माहिती नगरसेवकांना देण्यात यावी. अनेक भागांत सफाई कामगार नियमित येत नाहीत,” अशी तक्रार मांडली.
नगरसेविका वैशाली पाटील यांनी गटारींच्या स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. “गटारी नियमित साफ होत नाहीत. काढलेला कचरा तसाच रस्त्यावर पडून राहतो. महिला कामगार कचरा गोळा करून निघून जातात; मात्र तो उचलण्याची जबाबदारी कोणाची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रफुल्ल देवकर यांनी आदर्श नगर परिसरातील अस्वच्छतेकडे लक्ष वेधत तातडीने कारवाईची मागणी केली.
यावर सहाय्यक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, प्रभाग १३ मध्ये एकूण ७,४१० घरे असून कामगारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. कामात कसूर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. येत्या पाच दिवसांत अद्ययावत यादी लोकप्रतिनिधींना देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरूनही बैठकीत जोरदार चर्चा झाली. स्थायी समिती सदस्य नितीन सपके यांनी दौलत नगर, संभाजी नगर आणि रायसोनी नगर भागात नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार केली. गौरी हाईट्स परिसरात पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. “लोकांचे प्रश्न तात्पुरते नव्हे, तर कायमस्वरूपी सोडवले गेले पाहिजेत,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दौलत नगर हा भाग उंचावर असल्याने तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगितले. त्या सोडवण्यासाठी काम सुरू असून, सिंगल कनेक्शन घेतल्यास पाण्याचा दाब वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
पथदिव्यांच्या समस्येकडे लक्ष वेधताना नितीन सपके यांनी काव्यरत्नावली ते महाबळ रस्ता तसेच लांडोरखोरी उद्यान परिसरात दिवे वारंवार बंद राहत असल्याचे सांगितले. अंधारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीचा समारोप करताना महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. उन्हाळा जवळ येत असल्याने पाण्याचे नियोजन तातडीने करावे, प्रभागातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक नगरसेवकांना द्यावेत, पथदिवे वेळेवर सुरू-बंद होणे सुनिश्चित करावे आणि स्वच्छतेबाबत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
या बैठकीला प्रभागाचे चारही नगरसेवक नितीन सपके, सुरेखा तायडे, वैशाली पाटील आणि प्रफुल्ल देवकर तसेच पाणीपुरवठा, पथदिवे आणि आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे आता प्रभाग १३ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
