वाहतूक कोंडीवर प्रहार जैन मंदिरासमोर अतिक्रमण हटवले
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या हालअपेष्टा लक्षात घेता जळगाव महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी नवी पेठ परिसरात धडक कारवाई करत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. टॉवर चौक परिसरातील जैन मंदिरासमोरील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणावर विशेष लक्ष केंद्रित करत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सकाळपासूनच महानगरपालिकेच्या पथकाने नवी पेठ परिसरात मोहीम हाती घेतली. विशेषतः टॉवर चौकाजवळ रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक जागेत अनधिकृतपणे ठेवण्यात आलेल्या लोखंडी पेट्या, हातगाड्या व इतर साहित्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. परिणामी वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागत होता, तर पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत होते.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेत जैन मंदिरासमोरील सर्व अतिक्रमणे हटवली. कारवाईदरम्यान एकूण २० लोखंडी पेट्या आणि ६ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. जप्त साहित्य महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांवर नियमानुसार पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अतिक्रमणाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. सार्वजनिक रस्ते, चौक आणि फूटपाथ मोकळे करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे राबवण्यात येणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मनपाच्या या धडक कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक मोकळे करण्यासाठी प्रशासनाने कठोर पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहण्याचे संकेत मिळत आहेत.
