“जे कर्मचारी कामात कसूर करत असतील किंवा विनापरवाना गैरहजर राहतील, त्यांची नोंद वेळीच घ्या महापौर
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील स्वच्छतेवर कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम संदेश देत जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी, दि. १६ फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक ५ मधील आरोग्य विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. पहाटे सुमारे ७ वाजता झालेले या दौऱ्याने कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली.
महापौरांनी थेट हजेरी पुस्तकाची तपासणी केली. पटावर नोंदलेले कर्मचारी व प्रत्यक्ष कामावर उपस्थित कर्मचारी यांची सविस्तर माहिती घेऊन त्यांनी स्पष्ट केले की, “जे कर्मचारी कामात कसूर करत असतील किंवा विनापरवाना गैरहजर राहतील, त्यांची नोंद वेळीच घ्या. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त असणे गरजेचे आहे. जर कर्मचारी बेशिस्त वागत असतील, तर तात्काळ योग्य ती कारवाई करा, अन्यथा मला कठोर भूमिका घ्यावी लागेल.”
महापौरांचे निरीक्षण फक्त कार्यालयापुरते मर्यादित राहिले नाही; प्रभाग ५ मधील विविध व्यापारी संकुलांमध्येही त्यांनी स्वच्छतेची पाहणी केली. बाजारपेठेतील अस्वच्छतेसंदर्भात महापौरांनी संताप व्यक्त केला आणि स्पष्ट केले की, “मार्केटची स्वच्छता नियमित झालीच पाहिजे. व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या.”
या पाहणी दौऱ्यावर प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व गटनेते विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, मंगला चौधरी, महेश पाटील यांच्यासह महापालिकेचे इतर पदाधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
महापौरांच्या या अचानक दौऱ्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्याची प्रक्रिया गतीने सुरू झाली असून, शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नांवर प्रशासनाची कडक भूमिका सुरू राहणार आहे.
