अग्निशमन दलाच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील महाबळ कॉलनी परिसरात शनिवारी (दि. १४ फेब्रुवारी) रात्री उशिरा एका भाजीपाल्याच्या दुकानाला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण माल जळून खाक झाला. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेजारील दुकाने आणि परिसर मोठ्या अनर्थापासून वाचला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महाबळ कॉलनीतील नवजीवन दुकानासमोर किरण महाजन यांचे भाजीपाल्याचे दुकान असून, शनिवारी रात्री सुमारे १०.५० वाजेच्या सुमारास दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येताना स्थानिकांना दिसल्या. घटनेचे गांभीर्य ओळखून किशोर चावरे यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. दरम्यान, काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत दुकानातील सर्व साहित्य पेट घेतले.
या आगीत बटाटे, पालेभाज्या यांसह संपूर्ण भाजीपाला, दुकानातील फर्निचर, डीप फ्रीज, प्लास्टिक कॅरेट आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार, मध्यमवर्गीय विक्रेते किरण महाजन यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानीचा आकडा लाखोंमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५८५७, ५८६० व ५८६१ क्रमांकाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा जोरदार मारा करून काही वेळातच आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. आगीची तीव्रता लक्षात घेता शेजारील दुकानांनाही धोका निर्माण झाला होता; मात्र वेळेत कारवाई झाल्याने मोठा अनर्थ टळला.
या मदतकार्यामध्ये वाहनचालक देविदास सुरवाडे, मयूर ओतारी, प्रभाकर पाटील तसेच फायरमन रोहिदास चौधरी, वृषभ सुरवाडे, यश मनोरे, चेतन सपकाळे, ऋषिकेश जाधव, गणेश महाजन, तेजस बडगुजर, सौरभ चिकटे, भूषण पाटील, मयूर पाटील आणि रजनीश भावसार यांनी धाडसाने सहभाग घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट की अन्य कोणते कारण याचा तपास सुरू असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत सर्वस्व गमावलेल्या किरण महाजन यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
