दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह रेल्वेखाली आढळला
पोलिसांकडून सखोल तपास सुरू
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरात रविवारी (दि. १५ फेब्रुवारी) सकाळी रेल्वे पुलाजवळ एका प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून बाहेरगावी असल्याची माहिती असलेल्या या व्यक्तीचा मृतदेह रेल्वेखाली सापडल्याने हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
अमर वसंत सपकाळे (वय ४४, रा. खंडेराव नगर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. इस्त्री काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. साधी राहणी आणि कष्टमय जीवन जगणाऱ्या सपकाळे यांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळे हे गेल्या दोन दिवसांपासून बाहेरगावी गेले होते. रविवारी सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास स्थानिकांना रेल्वे पुलाजवळ मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला.
मृतदेह पुढील तपासासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. रुग्णालयात सपकाळे यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. कुटुंबीयांनी या घटनेमागे घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानेही भेट देऊन पाहणी केली. प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. रेल्वे अपघात की अन्य काही कारण, याबाबतचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे खंडेराव नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
