मध्यरात्री उसळल्या ज्वाळा; अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव शहरातील मेहरूण परिसरात असलेल्या रामेश्वर कॉलनी येथील साई गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तब्बल १८ दुचाकी वाहने जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून एखाद्या माथेफिरूने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
रामेश्वर कॉलनीतील साई गजानन रेसिडेन्सी ही बहुमजली निवासी इमारत असून येथे मोठ्या संख्येने कुटुंबे वास्तव्यास आहेत. रहिवाशांनी त्यांच्या दुचाकी नेहमीप्रमाणे अपार्टमेंटच्या आवारात उभ्या केल्या होत्या. मात्र शनिवारी मध्यरात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास अचानक या दुचाकींना आग लागल्याचे दिसून आले.
पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एका रहिवाशाला लघुशंकेसाठी बाहेर येताना खाली ज्वाळा उसळताना दिसल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तातडीने आरडाओरडा करून इतर रहिवाशांना सावध केले. काही नागरिकांनी तत्काळ पाण्याची मोटार सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दुचाकींच्या पेट्रोल टाक्यांचा स्फोट झाल्याने आग अधिक भडकली आणि विझवण्याचे प्रयत्न अडचणीत आले.
दरम्यान, जळगाव शहर महानगरपालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या बंबांच्या मदतीने काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले. या वेळी वाहनचालक देविदास सुरवाडे तसेच फायरमन रोहिदास चौधरी, यश मनोरे, चेतन सपकाळे, योगेश पाटील, ऋषभ सुरवाडे, भावेश मराठे आदींनी धाडसाने आणि तत्परतेने कामगिरी बजावली.
या आगीत आत्माराम जाधव, शिरीष सोनवणे, अजय कापुरे, सुरेश सोनवणे, शरद बोरसे, ललित वेडीस, ज्योती पवार, राजेश खिडके, भारत तामनेरकर, किरण पाटील, सुधीर पाटील, मनोज मोरे, धोंडू बडगुजर यांच्या प्रत्येकी एक तर सागर पाटील व संग्राम विसपुते यांच्या प्रत्येकी दोन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून सुरू असून, आग लागण्यामागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
