विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महापौर दिपमाला काळे यांचे कडक आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
दहावी आणि बारावीच्या महत्त्वाच्या बोर्ड परीक्षांचा कालावधी सुरू असताना शहरातील क्रिकेट प्रीमियर लीगमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होऊ नये आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम टाळण्यासाठी महापौर दिपमाला काळे यांनी ध्वनीक्षेपकांच्या (लाऊड स्पीकर) आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
सध्या संपूर्ण राज्यात उच्च माध्यमिक बारावीची परीक्षा सुरू असून, येत्या २० फेब्रुवारीपासून माध्यमिक दहावीच्या परीक्षांनाही प्रारंभ होत आहे. शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीत शांततेचे वातावरण राखणे अत्यंत आवश्यक आहे.
मात्र, याच काळात शहरातील जी.एस. ग्राऊंड आणि सागर पार्क येथे विविध क्रिकेट प्रीमियर लीगचे सामने रंगत आहेत. सामन्यांदरम्यान समालोचनासाठी वापरले जाणारे ध्वनीक्षेपक मोठ्या आवाजात सुरू ठेवले जात असल्याने परिसरातील शाळा, महाविद्यालये तसेच रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः अभ्यासाच्या निर्णायक टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांवर या गोंगाटाचा विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
आयोजकांसाठी स्पष्ट नियमावली
महापौर कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, शहरातील विविध कार्यक्रम व क्रिकेट लीग आयोजकांना काही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात शक्यतो मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन परीक्षेच्या काळात टाळावे, अशी सूचना देण्यात आली आहे. कार्यक्रमांदरम्यान ध्वनीक्षेपकांचा आवाज शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेतच ठेवावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सायंकाळी ६ वाजेनंतर ध्वनीक्षेपकांचा आवाज कमीत कमी ठेवणे बंधनकारक राहील. तसेच रात्री १० वाजल्यानंतर लाऊड स्पीकर पूर्णपणे बंद ठेवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित सर्वोच्च
“विद्यार्थ्यांचे भविष्य हेच शहराचे भविष्य आहे. मोठ्या आवाजामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊन शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सर्व आयोजक व नागरिकांनी संवेदनशीलतेने सहकार्य करावे,” असे आवाहन महापौर दिपमाला काळे यांनी केले आहे.
परीक्षेच्या या निर्णायक टप्प्यात विद्यार्थ्यांना शांत आणि अनुकूल वातावरण मिळावे, यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून, आता नागरिक आणि आयोजकांनीही जबाबदारीची जाणीव ठेवत सहकार्य करणे अपेक्षित आहे. शहराच्या प्रगतीचा पाया घालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी गोंगाटावर नियंत्रण ठेवणे हीच काळाची गरज असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
