एकाच कुटुंबातील आठ जण जखमी
साईमत/जळगाव /प्रतिनिधी
शहरातील मेहरुण तलाव परिसरात सोमवारी (२ फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास पोलीस एस्कॉर्ट वाहन आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षेतील एकाच कुटुंबातील सदस्यांसह एकूण आठ जण गंभीर जखमी झाले. रस्त्यावरील मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे प्रसिद्ध खासदार मनोज तिवारी हे पारोळा येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना ‘वाय प्लस’ (Y+) दर्जाची सुरक्षा असल्याने जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे एस्कॉर्ट वाहन देण्यात आले होते. खासदार तिवारी यांना संभाजीनगरच्या हद्दीत सुरक्षितरीत्या सोडून दिल्यानंतर हे पोलीस एस्कॉर्ट वाहन जळगावकडे परत येत असताना मेहरुण तलावाजवळ हा अपघात घडला.
नेहरूनगरजवळ रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याच वेळी समोरून येणारी रिक्षा मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरत थेट पोलीस वाहनावर आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षेचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर पोलीस वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या अपघातात ज्योती एकनाथ बारी (४५), एकनाथ रामदास बारी (५०), अश्विनी शुभम कुमावत (२५), रत्ना शंकर मिस्तरी (४८), सुशीला दिलीप बारी (५५), कीर्ती शिवाजी बारी (४०), कुणाल शिवाजी बारी (१३) आणि चार वर्षांची चिमुकली प्रियांशी शुभम कुमावत हे आठ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमी हे जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर येथील रहिवासी असून, त्यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनेची पुष्टी करताना, खासदारांच्या ताफ्यातील परतीच्या प्रवासात असलेल्या पोलीस वाहनाचा हा अपघात असल्याचे स्पष्ट केले. जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यांची दुरवस्था व जीवघेणे खड्डे हेच या अपघाताचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. वारंवार अपघात होऊनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
