विहिरीत पडलेल्या एका बकरीचे प्राण वाचवण्यात यश आले.
साईमत/जळगाव /प्रतिनिधी
शहरातील अग्निशमन विभागाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परता, कौशल्य आणि संवेदनशीलतेमुळे विहिरीत पडलेल्या एका बकरीचे प्राण वाचवण्यात यश आले. ही घटना रविवारी सकाळी जुने जळगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरजवळ घडली असून, अग्निशमन दलाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रविवार, १ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास जुने जळगाव भागातील एका विहिरीत बकरी पडल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच माजी नगरसेवक राजेश सोनवणे यांची कन्या प्रिया सोनवणे यांनी सकाळी ४:५५ वाजता जळगाव शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी तात्काळ संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी रवाना झाले.
मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी बचाव कार्याला सुरुवात केली. विहिरीची खोली व परिस्थितीचा अचूक अंदाज घेत अत्यंत शिताफीने जवानांनी दोरखंड व आवश्यक साधनांच्या मदतीने बकरीला सुरक्षितरित्या बाहेर काढले. काही वेळ चाललेल्या या धाडसी बचाव मोहिमेत बकरीला जिवंत आणि सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
बकरी सुखरूप बाहेर निघाल्याचे पाहून तिची मालकीण निर्मला सोनवणे आजीबाई यांनी सुटकेचा निश्वास टाकत अग्निशमन दलाच्या जवानांचे मनापासून आभार मानले. प्राणीमात्रांबाबत दाखवलेली ही संवेदनशीलता आणि तत्परता नागरिकांच्या मनात अग्निशमन दलाबद्दल आदर निर्माण करणारी ठरली.
या बचाव कार्यात वाहन चालक देविदास सुरवाडे तसेच फायरमन भूषण पाटील, वृषभ सुरवाडे, गिरीश खडके, चेतन सपकाळे आणि भावेश मराठे यांचा मोलाचा वाटा होता. अग्निशमन दलाच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे परिसरात समाधान आणि आनंदाचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून जवानांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
