गावातील बारागाड्यांच्या यात्रेच्या उत्सवात कुटुंबीय सहभागी झाले असताना ५५ वर्षीय प्रौढाने राहत्या घरी गळफास
साईमत/ममुराबाद /प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून, गावातील बारागाड्यांच्या यात्रेच्या उत्सवात कुटुंबीय सहभागी झाले असताना ५५ वर्षीय प्रौढाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (१ फेब्रुवारी) उघडकीस आली. भिकन किसन पाटील असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
ममुराबाद येथे सध्या पारंपरिक बारागाड्यांच्या यात्रेचा उत्साह सुरू आहे. रविवारी पाटील यांचे पत्नी व मुले यात्रेच्या सोहळ्यासाठी घराबाहेर गेले होते. यावेळी भिकन पाटील हे घरी एकटेच होते. कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत त्यांनी घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
काही वेळानंतर पत्नी व मुले यात्रेतून घरी परतले असता, भिकन पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. तातडीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस रुग्णालयात दाखल झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भिकन पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ममुराबाद गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
