खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शनाचे जळगावात दिमाखात उद्घाटन
साईमत/जळगाव /प्रतिनिधी
नव्या पिढीने पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहणे आवश्यक आहे. शेतीमध्ये ‘एआय’सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उत्पादनक्षमता वाढवावी, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
खान्देशची समृद्ध कृषी परंपरा, लोकसंस्कृती आणि पशुधनाचा वारसा जपणाऱ्या ‘खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शन २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. कृषी, संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचा संगम साधणारा हा महोत्सव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.
भाषणाच्या सुरुवातीला पालकमंत्री पाटील यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत, शेतकरी, कामगार, महिला व युवकांचे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आपण गमावल्याची भावना व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आधुनिक शेतीसाठी आज विपुल माहिती उपलब्ध असून तिचा योग्य वापर केल्यास युवकांना शेतीतून चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकते. युवकांनी शेतीकडे आधुनिक व्यवसाय म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृषी, पशुसंवर्धन आणि संस्कृती या तिन्ही घटकांचा संगम साधणारा हा महोत्सव असून, भविष्यात तो राज्य व देशपातळीवर ओळख निर्माण करेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. “हा महोत्सव म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
महिला बचत गटांच्या कार्याचे कौतुक करताना पालकमंत्री म्हणाले की, महिलांनी गावाची अर्थव्यवस्था बदलून टाकली आहे. महिला म्हणजे केवळ घर सांभाळणाऱ्या नाहीत, तर त्या संपूर्ण गावाच्या विकासाच्या शिल्पकार आहेत. तसेच शेतकरी आणि पशुधन यांचे नाते अतूट असून ग्रामीण भागात जनावरे ही केवळ मालमत्ता नसून कुटुंबाचा अविभाज्य घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पशुपालनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होत असून शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या मनोगतात जळगाव जिल्हा कृषीप्रधान व समृद्ध खाद्यसंस्कृतीचा जिल्हा असल्याचे नमूद केले. कृषी व खान्देशी संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्देशाने या महोत्सवाची संकल्पना राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञानाचा वापर, पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन, शासनाच्या विविध योजनांची माहिती, तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. पुढील पाच दिवसांत शाळा-महाविद्यालयांच्या सहली, शेतीविषयक चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका व डायरीचे तसेच कृषी विभागातर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘महाविस्तार एआय ॲप’चे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्र्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेट देऊन माहिती घेतली आणि स्वतः वस्तू खरेदी करून उपस्थितांना प्रोत्साहन दिले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या प्रदर्शनात कृषी निविष्ठा, अवजारे व साहित्याचे भव्य प्रदर्शन, शासकीय योजनांची माहिती, प्रात्यक्षिके, हस्तकला व गृहसजावटीच्या वस्तूंची आकर्षक दालने नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. कृषी व पशुवैद्यकीय विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, चर्चासत्रे, उद्योजकता विकास आणि महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. अहिराणी लोकपरंपरा, पारंपरिक लोककला व लोकनृत्यांचे सादरीकरण तसेच अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची जत्रा हे या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरत आहे.
हे भव्य प्रदर्शन दि. १ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार असून, शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाला शेतकरी बांधव, महिला बचत गट प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
