जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
साईमत/ जळगाव/प्रतिनिधी –:
शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळेल, असा आमिष दाखवून एका ६१ वर्षीय निवृत्त व्यक्तीची तब्बल १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कमलाकर धोंडू चौधरी (वय ६१, रा. तिवारी नगर, महाबळ रोड, जळगाव) हे सेवानिवृत्त आहेत. ३१ ऑगस्ट २०२५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना ‘Astha Trade 833 Education Community’ नावाच्या ग्रुपमध्ये ॲड केले. या ग्रुपद्वारे ‘ACSTRADE’ नावाचे ऑनलाइन शेअर ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्यास सांगितले गेले.
अॅप आणि ग्रुपद्वारे फिर्यादीला ५० टक्के नफा मिळवून दिला जाईल, असे खोटे आश्वासन देऊन आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. तथापि, जेव्हा कमलाकर चौधरी यांनी आपली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी विविध बँक खात्यांवर वेगवेगळ्या नावाखाली कर भरण्याचे कारण देत तब्बल १,३५,८५,१८९ रुपये घेतले, मात्र कोणतीही रक्कम परत दिली नाही.
फिर्यादींच्या तक्रारीनुसार, आरोपींमध्ये कुणाल कुमार, नेहा बन्सल आणि आरव गुप्ता यांचा समावेश असून ते मोबाईल नंबरवरून संपर्क साधत होते. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.
सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, कोणत्याही ऑनलाइन गुंतवणुकीपूर्वी अधिकृत स्रोतांची पडताळणी करणे अत्यावश्यक आहे.
