६ फेब्रुवारीला जळगाव महापालिकेत महापौर-उपमहापौर निवडीची प्रक्रिया
साईमत/ जळगाव/प्रतिनिधी –:
जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ६ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत नवनिर्वाचित सदस्यांमधून महापौर व उपमहापौर निवडले जाणार आहेत.
विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, या विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैठकीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील सर्व तरतुदींचे काटेकोर पालन करुन कार्यवाही पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, बैठकीचे संपूर्ण इतिवृत्त महानगरपालिकेच्या नोंदवहीत नोंदवून सविस्तर अहवाल सादर करणे हे देखील पीठासीन अधिकाऱ्याचे कर्तव्य राहणार आहे.
यापूर्वी, मालेगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संबंधित सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत आगामी महत्त्वपूर्ण टप्पा पार पडण्याची अपेक्षा आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित राहणार असून, महापौर व उपमहापौर निवडीसाठी राजकीय गटांमध्ये चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.
