सावखेडा शिवारातील लेण्याद्री कॉलनीत बंद घर फोडून चोऱ्या
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी –
शहरातील घरफोडीच्या घटनांचा सत्र दिवसेंदिवस वाढत चालला असून, सावखेडा शिवार परिसरातील लेण्याद्री कॉलनीतील एका बंद घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी तब्बल ३० हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी निलेश परमेश्वर राजपूत (वय ४३, रा. मोहाडी, ता. जामनेर, ह.मु. सावखेडा शिवार) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या एका वर्षापासून जळगाव येथील लेण्याद्री कॉलनी, गट क्रमांक १६०, प्लॉट क्रमांक ३९ मधील घरात वास्तव्यास आहेत. दि. १५ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी घराचे दरवाजे कुलूप लावून शेतीच्या कामासाठी मूळ गावी मोहाडी येथे रवाना झाले होते.
पण दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या किशोर पाटील यांनी निलेश यांना फोन करून माहिती दिली की, त्यांच्या घराचे कुलूप तुटले असून दरवाजा उघडा आहे. निलेश राजपूत यांनी तातडीने नातेवाईकांसह घरी धाव घेतली असता, घराचा कडीकोंडा कापलेला आणि अडचणीत पडलेला आढळला.
या घरफोडीत तब्बल ३० हजार रुपयांच्या किंमतीची रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरट्यांनी नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुका पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सखोल तपास सुरु केला आहे. परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची आणि घरात सुरक्षा उपाय वाढवण्याची शिफारस पोलिसांनी केली आहे.
शहरातील घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण होत असून, पोलिसांकडून अशा घटना टाळण्यासाठी नियमित गस्त वाढवण्याचा इशारा दिला आहे.
