बाजारपेठेत विक्रेत्यांची धावपळ, थंडी आणि आरोग्यावर चिंता
साईमत/जळगाव/प्रतिनिधी –
मंगळवारी, २७ जानेवारी रोजी जळगाव शहरासह जिल्हाभरात अचानक अवकाळी पाऊस पडल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनात खळबळ उडाली. कडाक्याची थंडी अपेक्षित असताना सायंकाळी सुमारे पाच वाजता आकाशात काळे ढग दाटले आणि जोरदार पावसाने अचानक हजेरी लावली. कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे शहरातील नागरिक आणि वाहनस्वार या अचानक परिस्थितीमध्ये अडकले.
सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील टॉवर चौक, आकाशवाणी चौक आणि गोलाणी मार्केट परिसरात नागरिकांची आणि दुचाकीस्वारांची धावपळ पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले, तर काही ठिकाणी वाहतुकीला त्रास झाला.
या पावसाचा सर्वात मोठा फटका शहरातील लहान विक्रेत्यांना बसला आहे. रस्त्यांवर बसणाऱ्या फळविक्रेत्यांचे फळे पाण्यात भिजली, तर कापड दुकानदारांचे मालधुत नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे नशिराबाद, असोदा आणि आसपासच्या परिसरातही जोरदार पावसाचे स्वरूप दिसून आले.हिवाळ्याच्या या थंडीत पडलेल्या पावसामुळे वातावरणात आर्द्रतेत वाढ झाली असून, डॉक्टरांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. खोकला, ताप आणि सर्दीसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, रब्बी हंगामातील पिकांवर या पावसामुळे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, थंडी आणि पावसाचा हा दुहेरी परिणाम काही दिवस कायम राहू शकतो, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.
