ऑटोमेटेड फिटनेस सेंटरमुळे रिक्षाचालकांचे हाल; युनियनचा इशारा
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
जिल्ह्यातील व्यावसायिक वाहनधारकांना मोठा आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण करणाऱ्या ‘ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर’च्या रद्दीकरणामुळे रिक्षाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या निर्णयाचा निषेध करत वीर सावरकर रिक्षा युनियनच्या वतीने आज जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले गेले.
जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनासमोर उभे राहून त्यांनी या धोरणाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. रिक्षाचालकांच्या मते, जळगावात फिटनेस सेंटर नसल्यामुळे आता त्यांना रिक्षा, टॅक्सी आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांत जावे लागत आहे. यामुळे इंधन, टोल, वेळ व मनोबलाचा मोठा अपव्यय होत असून, रिक्षाचालकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
निवेदनात दिलीपभाऊ सपकाळे यांनी प्रशासकीय दुर्बलतेवर थेट टोला मारत म्हटले,
“जर एखादी व्यक्ती मृत्यू पावली आणि विधी करण्यासाठी यंत्रणा नसेल, तर आपण विधी थांबवतो का? आपण तो संपन्न करतोच. मग आरटीओ कार्यालयात जोपर्यंत नवीन सेंटर कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत जुन्या मॅन्युअल पद्धतीने फिटनेस सर्टिफिकेट का दिले जात नाही?”युनियनने ठामपणे मागणी केली की, नवीन अत्याधुनिक यंत्रणा जळगावात कार्यान्वित होईपर्यंत स्थानिक स्तरावर मॅन्युअल पद्धतीने फिटनेस तपासणी सुरू ठेवावी.
या आंदोलनात जिल्ह्यातील रिक्षाचालक आणि मालकांची मोठी संख्या उपस्थित होती. यामध्ये वाल्मिक सपकाळे, रमेश सोनार, शशिकांत जाधव, शांताराम पाटील, एकनाथ बारी यांचा समावेश होता. युनियनने सरकारला इशारा दिला की, रिक्षाचालकांचे आर्थिक शोषण थांबवून हा प्रश्न त्वरित सोडविला गेला नाही, तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
