मेहरुण तलाव परिसरात निवृत्त पोलीसावर प्राणघातक हल्ला; दोन जणांविरोधात गुन्हा
साईमत /जळगाव/प्रतिनिधी : –
जळगाव शहरातील शांततेसाठी प्रसिद्ध मेहरुण तलाव परिसरात एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर शुक्रवारी रात्री १०:३० वाजता प्राणघातक हल्ला झाला. या धक्कादायक घटनेनंतर शनिवारी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अनंत प्रमोद गोंडे व अनिल शंकर लागवणकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी विजय सुकलाल जोशी (वय ६५, रा. शिवबानगर, कोल्हे हिल्स) हे पोलीस दलातून सेवानिवृत्त असून, त्यांनी माजी पोलीस म्हणून आणि जबाबदार नागरिक म्हणून दोघांना समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु जोशी यांनी समज दिल्याचा राग असलेल्या आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
अनंत गोंडे यांनी हातातील चाकूने जोशी यांच्या पोटावर डाव्या आणि उजव्या बाजूला गंभीर वार केले. एवढ्यावरच न थांबता दोन्ही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अश्लील शब्दांमध्ये शिवीगाळ केली. या हल्ल्यात जोशी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीसांनी घटनास्थळीून पुरावे गोळा केले असून, आरोपींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
