महापौर कोण? जळगावात आरक्षणाचा सस्पेन्स कायम; प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात इच्छुकांची धडधड
साईमत /जळगाव /प्रतिनिधी :
जळगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा रणसंग्राम आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. केवळ काही तासांत, उद्या १३ जानेवारीपासून प्रचाराच्या तोफा थंडावणार असून १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. मात्र, निवडणुकीचा कौल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्याप महापौर पदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि सस्पेन्सचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठेची ही लढाई असल्याने सर्वच पक्षांनी प्रचारात ताकद पणाला लावली असून प्रभागनिहाय जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र, एवढ्या घडामोडींमध्येही जळगावचा पुढील महापौर सर्वसाधारण प्रवर्गातील असणार की राखीव प्रवर्गातून, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे प्रचाराचा उत्साह असला तरी सत्ता-समीकरणाबाबत अनिश्चिततेचे सावट कायम आहे.
महापौर पदाकडे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींचे लक्ष लागले आहे. मात्र, आरक्षण जाहीर न झाल्याने दोन्ही आघाड्यांच्या नियोजनाला मोठा फटका बसला असून इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली आहे. महापालिकेच्या नियमानुसार महापौर पदाचे आरक्षण राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जाहीर केले जाते. यंदा मात्र आरक्षणाची अधिसूचना अद्याप निघालेली नसल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून आरक्षणाची सोडत नेमकी कधी जाहीर होणार, याकडे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे तसेच निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे. जळगावचे महापौर पद महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय की सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहणार, याबाबत शहरात चर्चांना उधाण आले आहे. प्रत्येक शक्यतेनुसार समीकरणे मांडली जात असून राजकीय विश्लेषणांना वेग आला आहे.
महापौर पदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांची संपूर्ण रणनीती सध्या अडचणीत आली आहे. अनेक प्रभागांमध्ये प्रचाराचा वेग वाढला असला, तरी अंतिम सत्ता-समीकरण महापौर पदाच्या आरक्षणावरच अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट आहे. परिणामी, अनेक दिग्गज नगरसेवक आणि संभाव्य महापौरपदाचे इच्छुक सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका स्वीकारून आहेत. सार्वजनिक प्रचारात शांतता दिसत असली, तरी पडद्यामागील हालचालींना मात्र चांगलाच जोर आला असून, आरक्षण जाहीर होताच जळगावच्या राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
