मराठी पत्रकार दिनानिमित्त राज्यातील दहा विद्यापीठांचे विशेष ऑनलाइन व्याख्यान
साईमत जळगाव प्रतिनिधी
मुद्रणकलेनंतर जर कोणती मोठी क्रांती झाली असेल, तर ती कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची आहे. पत्रकारितेत अनेक नवे प्रयोग झाले असले, तरी मानवी मेंदूला टक्कर देण्याची क्षमता असलेली कृत्रिम बुद्धीमत्ता ही अत्यंत संवेदनशील बाब असून, तिचा वापर पत्रकारांनी अधिक सजगता आणि विचारपूर्वक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्रातील दहा विद्यापीठांच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागांतर्फे मंगळवारी (६ जानेवारी) ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि माध्यमे’ या विषयावर विशेष ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन व्याख्यानाचे हे सहावे वर्ष असून यावेळी पुणे विद्यापीठाच्या पुढाकाराने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या संयुक्त कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (नागपूर), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (छत्रपती संभाजीनगर), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (सोलापूर), मुंबई विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) आणि श्रीमती दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (मुंबई) सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सदानंद मोरे होते. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय बिजले आणि प्रा. डॉ. योगेश बोराटे यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. मोरे यांनी पत्रकारितेच्या विकासाचे विविध टप्पे स्पष्ट करताना सांगितले की, कृत्रिम बुद्धीमत्तेचा शोध अनेक वर्षांपूर्वी लागला असला, तरी सध्या तिचा वापर सर्वच क्षेत्रांत झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाला जसे सकारात्मक व नकारात्मक पैलू असतात, तसेच एआयचेही आहेत. त्यामुळे पत्रकारांनी एआय-साक्षर होत या तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय बिजले यांनी एआयमुळे बातम्यांमध्ये साचेबद्धता वाढण्याचा धोका असल्याचे नमूद केले. वृत्तपत्रांच्या मांडणीसाठी, मुद्रित शोधासाठी तसेच आकर्षक हेडींगसाठी एआयचा वापर होत असला, तरी चुकीची माहिती प्रसारित होण्याचा धोका वाढल्याने फॅक्ट-चेकिंगला अधिक महत्त्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. योगेश बोराटे यांनी माध्यमांमध्ये एआयचा बहुआयामी वापर कसा करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. एआयचा उपयोग केवळ मजकूरनिर्मितीपुरता न ठेवता संशोधन पत्रकारितेसाठीही प्रभावीपणे करता येऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
ऑनलाइन व्याख्यानात, प्रा. डॉ. निशा मुडे-पवार (विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), प्रा. राम भावसार (प्र-संचालक, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), प्रा. डॉ. संजय तांबट (विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), प्रा. डॉ. माधवी रेड्डी (विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), प्रा. डॉ. दिनकर माने (विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर), प्रा. डॉ. सुहास पाठक (संचालक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर (प्र-विभागप्रमुख, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), प्रा. डॉ. प्रबास साहु (प्र-विभागप्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर), प्रा. डॉ. सुंदर राजदिप (विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ, मुंबई), प्रा. डॉ. मीरा देसाई (विभागप्रमुख, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई) आणि प्रा. डॉ. सरफराज अन्सारी (विभागप्रमुख, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली) यांनी मनोगत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय तांबट यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. डॉ. गोपी सोरडे यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी डॉ. वृषाली बर्गे, डॉ. मनीषा मोहोड,प्रा. रोहित देशमुख यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात राज्यातील विविध विद्यापीठांतील शेकडो विद्यार्थी, प्राध्यापक आणि पत्रकारांनी सहभाग नोंदविला.
