जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त
साईमत /मलकापूर/प्रतिनिधी
प्रत्येक स्त्रीने आपल्यातील स्त्रीशक्ती ओळखून आत्मभानाने वागले पाहिजे. सावित्रीबाई फुले यांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते आपल्या कृतीत उतरवले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रा.शारदा खर्चे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शारदा खर्चे होत्या.
येथील जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व वैचारिक विकासासाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.डी.ए.डहाके व प्रा.ए.बी.बर्डे उपस्थित होते. स्पर्धेत “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य” या विषयावर १२ विद्यार्थ्यांनी वक्तृत्व सादर केले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
स्पर्धकांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व स्त्रीसक्षमीकरणाच्या कार्याचा सखोल अभ्यासपूर्ण आढावा मांडत उत्कृष्ट प्रतिसाद दिला. परीक्षक प्रा.डी.ए.डहाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या विचारांच्या वाटेवर आत्मविश्वासाने कसे चालावे तसेच वैचारिक व ज्ञानक्षेत्रातील क्षमता कशी वाढवावी, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पल्लवी चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.एन.पी. अहिरे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
