धुळे मनपा निवडणुकीतील पक्षाच्या ५९ उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
साईमत/धुळे/प्रतिनिधी
येथील महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे ६३ पैकी चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यानंतर आता निवडणूक रिंगणातील पक्षाच्या ५९ उमेदवारांच्या प्रचाराचे रणशिंग रविवारी (ता. ४) दुपारी दोनला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत फुंकले जाणार आहे.
येथील महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ७४ पैकी ६३ जागांवर उमेदवार दिले आहेत. यापैकी माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत चार उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आता निवडणूक रिंगणात पक्षाचे ५९ उमेदवार आहेत. या उमेदवारांच्या सामूहिक प्रचाराचा श्रीगणेशा करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रविवारी दुपारी दोनला जाहीर सभा होत आहे. प्रारंभी खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती श्री एकवीरामातेच्या मंदिरात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते व सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत १०१ नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ होईल.
यानंतर श्री एकवीरामाता मंदिरासमोरील पांझरा नदीकाठच्या रस्त्यावर श्री. चव्हाण यांची दुपारी दोनला जाहीर सभा होईल. सभेत भाजपच्या विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडला जाईल. यावेळी पक्षाचे विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांच्यासह पक्षाचे सर्व उमेदवार,
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असतील. सभेला धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, शशी मोगलाईकर, पवन जाजू, सुनील कपिल, महानगर जिल्हा उपाध्यक्ष श्याम पाटील यांनी केले.
