नागरिकांच्या मूलभूत गरजा प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर
साईमत/फैजपूर/प्रतिनिधी
फैजपूर नगरपालिकेच्या नव्या नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ यांनी १ जानेवारी रोजी पदभार स्वीकारला. सराफ गल्ली येथील निवासस्थानापासून सर्व नगरसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पेहेड वाडा-खुशाल भाऊ रोड मार्गे नगरपालिकेपर्यंत गेली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी पुष्पगुच्छ देऊन दामिनी सराफ यांचे स्वागत केले. सभागृहात नगराध्यक्ष, भाजपा गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे, उपगटनेता सुरज गाजरे तसेच उपस्थित नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याधिकाऱ्यांनी स्वागत केले. सभागृहात मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, नगराध्यक्ष दामिनी सराफ तसेच नगरसेवक नरेंद्र नारखेडे, हिरालाल चौधरी, हर्षल पाटील आणि भाजपा गटनेते यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष दामिनी सराफ यांनी सांगितले की, फैजपूर नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प मनाशी घेतला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा प्राधान्याने पूर्ण करणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे हा त्यांचा पहिला उद्देश राहील. शहरातील रखडलेली विकास कामे गतीने पूर्ण करून नवीन विकास प्रकल्पांसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्यावर भर देणार आहेत. फैजपुरला आदर्श, स्वच्छ आणि विकासाभिमुख शहर बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व नगरसेवक, अधिकारी आणि नागरिकांसह पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान प्रशासन देणे ही त्यांची पुढील वाटचाल राहील.
यावेळी भाजपा गटनेते नगरसेवक सिद्धेश्वर वाघुळदे, उपघटनेते नगरसेवक सुरज गाजरे, महेंद्र मंडवाले, पप्पू चौधरी, सागर होले, दिपाली भारंबे, नीलिमा महाजन, जयश्री चौधरी, सुनिता नेहेते, भावना भारंबे, अमिता चौधरी यांच्यासह पवन सराफ, हेमराज चौधरी, अनंता नेहेते, संदीप भारंबे, चंदू कोळी, राजेश महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, हर्षल पाटील, डॉ.नरेंद्र कोल्हे, प्रभाकर सोनवणे, डॉ. कुंदन फेगडे, नितीन राणे, राहुल गुजराथी, राकेश जैन, राकेश सराफ, निळकंठ सराफ, अनिल सराफ यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.
