भडगावमध्ये वाळू माफियांचा उन्माद ; जेसीबी, दोन डंपर, एक ट्रॅक्टरसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त
साईमत/भडगाव/ प्रतिनिधी
तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करताना वाळू माफियांनी थेट महसूल व पोलिस प्रशासनालाच लक्ष्य केले. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या कारवाईदरम्यान महसूल अधिकारी व पोलिसांना शिवीगाळ व धमक्या दिल्या गेल्या. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात रितेश पाटील उर्फ आबा (रा.पाचोरा) यांच्यासह २० ते २५ अज्ञात वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव तहसीलदार यांच्या आदेशानुसार गिरणा नदीपात्रात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल पथक तैनात करण्यात आले होते. दि.३० डिसेंबर रोजी रात्री १०.४२ वाजेच्या सुमारास गिरड-मांडकी रस्त्यावर गस्त सुरू असताना नदीपात्रातून वाळू भरून येणारी वाहने पथकाच्या निदर्शनास आली. तत्काळ कारवाई करत पथकाने एक जेसीबी, सोनालिका कंपनीचा डीआय-७४५ ट्रॅक्टर व त्याला किन्ही यंत्र लावलेले तसेच टाटा कंपनीचे दोन डंपर क्र.(एम.एच.१८ बी.झेड.७४७५ व (एम.एच.१९ सी.वाय.७०९५) ताब्यात घेण्यात आले.
कारवाई सुरू असतानाच अचानक २० ते २५ जणांचा जमाव घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी वाहन जप्त करण्यास तीव्र विरोध करत महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली. ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. या कारवाईत जप्त केलेल्या वाहनांचा व वाळूचा एकूण अंदाजे ३७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल सरकारी ताब्यात घेण्यात आला.
या घटनेप्रकरणी महसूल सहायक प्रशांत किसन सावरकर यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, धमकी, व अवैध वाळू उत्खनन-वाहतूक यासंबंधी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. गिरणा नदीपात्रातील नैसर्गिक संपत्तीची लूट कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. वाळू माफियांविरोधात कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल व पोलिस प्रशासनाने दिला आहे.
