छाननी प्रक्रियेला सुरुवात
साईमत/जळगाव /प्रतिनिधी :
जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेला बुधवार (३१ डिसेंबर) रोजी सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली आहे. छाननीच्या पहिल्याच दिवशी महापालिका परिसरात उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
७५ जागांसाठी १०३८ उमेदवार
महापालिकेच्या ७५ जागांसाठी तब्बल १०३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, प्रत्येक जागेसाठी सरासरी १४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
६ कक्षांत छाननी
अर्जांची तांत्रिक व कायदेशीर तपासणी करण्यासाठी महापालिका आवारात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे ६ स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. प्रत्येक अर्जाची बारकाईने छाननी केली जात आहे.
हरकती, वकिलांची उपस्थिती
छाननीदरम्यान उमेदवारांकडून एकमेकांविरोधात हरकती दाखल करण्यात आल्या.
शपथपत्रातील त्रुटी, गुन्हेगारी माहिती, आरक्षणाचे दाखले व नामनिर्देशन पत्रातील चुका या मुद्द्यांवर आक्षेप नोंदवले जात आहेत. काही उमेदवारांनी वकिलांची मदत घेतल्याने वातावरण तापले आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
संभाव्य तणाव लक्षात घेता महापालिका परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
