मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सायबर गुन्हेगारांचे सोपे लक्ष्य
साईमत/दिल्ली/प्रतिनिधी:
सणासुदीचा काळ असो किंवा नवीन वर्षाचे स्वागत, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होणे आता सामान्य झाले आहे. मात्र, आनंदाच्या या वातावरणात सायबर चोरटेही तितकेच सक्रिय झाले आहेत. सध्या नवीन वर्षाच्या डिजिटल ग्रीटिंग्स आणि शुभेच्छा मेसेजच्या नावाखाली ‘एपीके’ (APK) फाइल्स पाठवून मोबाईल युझर्सची फसवणूक करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे १८ वर्षांखालील मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच या सायबर गुन्हेगारांचे सोपे लक्ष्य ठरत आहेत.
या फसवणुकीची पद्धत अत्यंत साधी पण तितकीच घातक आहे. सायबर चोरटे व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा ईमेलद्वारे ‘नवीन वर्षाच्या शुभेच्छा’ देणारे आकर्षक मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये एखादे विशेष डिजिटल ग्रीटिंग कार्ड किंवा फोटो पाहण्यासाठी सोबत दिलेली फाइल डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. ही फाइल प्रत्यक्षात एक ‘एपीके’ (Android Package Kit) फाइल असते. एकदा का युझरने ही फाइल डाऊनलोड करून इन्स्टॉल केली, की त्याच्या नकळत मोबाईलचा संपूर्ण ताबा सायबर चोरट्यांकडे जातो. फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक युझर्सच्या तक्रारीनुसार, ही फाइल डाऊनलोड केल्यानंतर काही वेळातच फोनमध्ये विचित्र बदल जाणवू लागतात. फोनमधील विविध ॲप्स युझरच्या परवानगीशिवाय आपोआप उघडले जातात. चोरटे फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट, मेसेज आणि गॅलरीचा ताबा घेतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या माध्यमातून बँक खाती किंवा युपीआय (UPI) ॲप्सचा वापर करून अनधिकृत आर्थिक व्यवहार केले जात असल्याचे समोर आले आहे.
सायबर तज्ज्ञांच्या मते, या एपीके फाइल्स अशा प्रकारे डिझाइन केलेल्या असतात की त्या बॅकग्राऊंडला गुपचूप काम करतात. युझरला आपला फोन हॅक झाला आहे याची पुसटशी कल्पनाही येत नाही. सणासुदीच्या काळात मेसेजची देवाणघेवाण प्रचंड वाढलेली असते, याचाच फायदा चोरटे घेतात. लोक घाईघाईत लिंकवर क्लिक करतात आणि नकळत आपला वैयक्तिक डेटा धोक्यात घालतात. हैदराबाद पोलीस खात्याच्या सायबर विभागाने या वाढत्या धोक्याची दखल घेत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. फसवणूक करणारे लोक पैसे आणि वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी व्हॉट्सॲप आणि ईमेलचा वापर करून बनावट एपीके फाइल्स व्हायरल करत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अज्ञात नंबरवरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
फसवणूक ओळखायची कशी…?
सायबर चोरट्यांकडून येणाऱ्या मेसेजेसमध्ये अनेकदा काही विशिष्ट गोष्टी समान असतात. त्याकडे लक्ष दिल्यास फसवणूक टाळता येऊ शकते: अत्यंत घाई (Urgency): ‘लगेच क्लिक करा’ किंवा ‘बक्षीस मिळवण्यासाठी तातडीने डाऊनलोड करा’ असे मेसेज. चुकीचे स्पेलिंग: मेसेजमधील शब्दांमध्ये अनेकदा शुद्धलेखनाच्या चुका असतात. खाजगी माहितीची मागणी: अधिकृत कंपन्या कधीही ओटीपी (OTP), पिन किंवा बँक डिटेल्स मेसेजद्वारे मागत नाहीत. अज्ञात लिंक्स: ज्या लिंकच्या सुरुवातीला ‘https’ नाही किंवा ज्यांचे नाव विचित्र आहे, अशा लिंक्सपासून लांब राहा. नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना डिजिटल सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. त्यामुळे केवळ अधिकृत ‘प्ले स्टोअर’वरूनच ॲप्स डाऊनलोड करावेत आणि अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या कोणत्याही फाइलपासून सावध राहावे.
