मोतीमाता देविच्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा दि.३ व ४ जानेवारी रोजी भरणार आहे
साईमत /जामनेर /प्रतिनिधी
तालुक्यातील गारखेडा येथून जवळच असलेल्या मांडवेदिगर (ता.भुसावळ) येथे मोतीमाता देविच्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा दि.३ व ४ जानेवारी रोजी भरणार आहे.
बंजारा समाजाची कुलस्वामिनी मोतीमाता देवीचे जागृत देवस्थान असून या देवीचा यात्रोत्सव सालाबादाप्रमाणे मोतीमाता मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे यावर्षी देखील शाकंभरी(पौष) पौर्णिमेला दि.३ जानेवारीआणि ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या यात्रोत्सवामध्ये संपूर्ण खान्देश व महाराष्ट्रातील विविध भागातून बंजारा समाज व अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.
या यात्रोत्सवाला जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे मुंबई विभागीय अध्यक्ष अशोकराव चव्हाण आणि सर्व पदाधिकारी, पोलिस पाटील रविंद्र पवार, सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, समितीचे सर्व सदस्य, गावातील सर्व युवक मंडळ, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक पोलिस प्रशासन यांचे सहकार्य लाभत असते.
यात्रोत्सवामध्ये परिसरातील सर्व व्यापारी, मिठाई दुकानदार, भांडी दुकानदार, खेळणी दुकानदार तसेच सर्व प्रकारच्या व्यावसायिक बांधवांनी आपापली दुकाने लावावीत, असे आवाहन मोतीमाता मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सरीचंद पवार, उपाध्यक्ष धनराज पवार, सचिव गोविंद पवार, खजिनदार चरणदास पवार, सहसचिव संत्रीबाई पवार, संचालक हरी पवार, भगवान पवार, गणेश पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व संचालक मंडळांनी केले आहे.
