साईमत धरणगाव प्रतिनिधी (रविंद्र कंखरे)
सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात ऑनलाईन खरेदीच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच ग्राहक फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. यासोबतच ग्राहकांची जागरूकता आणि साक्षरता निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन साहित्यिक व ग्राहक साक्षरता तज्ज्ञ डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी धरणगाव तहसील कार्यालयात ग्राहक जागृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी रेवना कांबळे होत्या, तर मंचावर पुरवठा अधिकारी किशोर मोरे, ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे, आणि तालुका अध्यक्ष विनायक महाजन उपस्थित होते.
डॉ. सोनवणे यांनी आपल्या व्याख्यानात ग्राहक पंचायतीचे महत्त्व, ग्राहक दिनाचे उद्दिष्ट आणि ग्राहकांची जबाबदारी विविध उदाहरणांसह स्पष्ट केली. त्यांनी नागरिकांना ऑनलाईन व्यवहारात सतर्क राहण्याचे आवाहन केले व ग्राहक साक्षरतेच्या प्रसारासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात दिनेश तायडे आणि विनायक महाजन यांनी मनोगत व्यक्त करून ग्राहक शिक्षणाच्या कार्याला पाठिंबा दिला. अध्यक्षीय भाषणात रेवना कांबळे यांनी ग्राहक पंचायतीची उपयुक्तता सांगितली आणि ग्रामीण भागात या चळवळीला पुढे नेण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन राजू ओस्तवाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुरवठा अधिकारी रितेश पवार यांनी पार पाडले. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघाचे अध्यक्ष जी.डी. पाटील, आबा वाघ, अनिल गुप्ता, अरविंद ओस्तवाल यांच्यासह ग्राहक, दुकानदार आणि तहसील कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमातून नागरिकांमध्ये ग्राहक अधिकारांची जाणीव निर्माण करण्यास तसेच ऑनलाईन व ऑफलाइन व्यवहारात सजगतेला चालना देण्यास महत्त्वाचा ठसा उमटल्याचे पाहायला मिळाले.
