मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, जीवघेणा हल्ला, शस्त्रांचा वापर, दहशत निर्माण करणे तसेच सार्वजनिक शांततेचा भंग अशा गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल .
साईमत/ मलकापूर /प्रतिनिधी :
शहरात सातत्याने दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात आरोपी आरिफ खान उर्फ खेबड्या कौसर खान याच्यावर अखेर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मलकापूर शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आरिफ खान (वय २४, रा. माळीपुरा, मलकापूर) हा सन २०२३ पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असून त्याच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, जीवघेणा हल्ला, शस्त्रांचा वापर, दहशत निर्माण करणे तसेच सार्वजनिक शांततेचा भंग अशा गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक उघडपणे तक्रार देण्यासही घाबरत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती.
यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असतानाही त्याच्या वर्तनात कोणताही सुधार झालेला नव्हता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी एमपीडीए अंतर्गत कारवाई करणे आवश्यक असल्याचा सविस्तर अहवाल मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी सादर केला.
हा प्रस्ताव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वारे यांच्या सूचनेनुसार तयार करून पोलीस अधीक्षक निलेश तांबे (बुलढाणा) यांच्या मार्फत जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून त्यास मंजुरी देत आरोपी आरिफ खान याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष अंमलबजावणीत पोलीस निरीक्षक गणेश गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वारे, पोलीस अंमलदार आसिफ शेख, योगेश तायडे, संतोष कुमावत, प्रविण गवई, नवल राठोड व आनंद माने यांनी केली.
