श्रीमद् भागवत गीतेचे संपूर्ण १८ अध्याय तोंडी पाठ करण्याचा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
साईमत/ फैजपूर /प्रतिनिधी :
फैजपूर येथील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीच्या वतीने महिला वर्गासाठी श्रीमद् भागवत गीतेचे संपूर्ण १८ अध्याय तोंडी पाठ करण्याचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेली परीक्षा फैजपूर येथील श्रीराम मंदिरात पार पडली. या परीक्षेसाठी गीतादास चंद्रकांत महाराज साक्रीकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे सचिव व डिंगंबर महाराज मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे हे उपस्थित होते.
परीक्षेत चार महिलांनी श्रीमद् भागवत गीतेचे संपूर्ण १८ अध्याय तोंडी पाठ म्हणून सादर करून यशस्वीरीत्या परीक्षा उत्तीर्ण केली. उत्तीर्ण झालेल्या महिलांमध्ये कुंदा लक्ष्मण पाटील (भुसावळ), सुहासिनी गंगाधर चौधरी (फैजपूर), रुपाली रविंद्र भारंबे आणि ज्योसना त्रंबक इंगळे (न्हावी) यांचा समावेश आहे.समितीच्या वतीने ४ ते ११ जानेवारी या कालावधीत भव्य दिव्य सामूहिक तुळशी अर्चन, नामजप, संगीत रामायण आणि नामसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात उत्तीर्ण महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्र नारखेडे यांनी दिली.
श्रीमद् भागवत गीतेतील तत्त्वज्ञान जीवन अधिक आदर्श आणि संस्कारक्षम बनविण्यास अत्यंत उपयुक्त असल्याने समाजहिताच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमास किरण चौधरी, काशिनाथ वारके, सुरेश परदेशी, किशोर कोल्हे, एन.पी. चौधरी, एल.आर.पाटील, दिलीप पाटील, राजाराम महाजन यांच्यासह गीता पठण महिला मंडळाच्या सदस्य व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
