विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभाप्रसंगी प्रा. गणेशन कन्नबीरन यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
प्रामाणिकपणा, अथक परिश्रम व विनम्रता हे तीन गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारले तर त्यांना जीवनात यश हमखास मिळू शकेल.त्यासाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ नागरिक बनवेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे संचालक प्रा. गणेशन कन्नबीरन यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सर्वश्री राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भूकन, प्राचार्य जगदीश पाटील, प्राचार्य एस.आर. राजपूत, प्रा.जे.व्ही. साळी, प्राचार्य संजय सुराणा, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, नितीन झाल्टे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, डॉ. पराग मसराम, सीए रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
विद्यापीठाची देशपातळीवर दखल घेतली गेल्याचे सांगून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळविला असल्याचे अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी सांगितले. यावेळी काढण्यात आलेल्या दीक्षांत मिरवणुकीच्या अग्रभागी विद्यापीठाचा मानदंड घेऊन उप कुलसचिव (अ.का.) सुनील हतागडे होते. राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीत सादर झाले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी कुलगुरुंकडे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली. अधिष्ठाता प्राचार्य एस.आर. राजपूत यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, प्रा. अनिल डोंगरे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, डॉ.जगदीश पाटील यांनी मानव विज्ञान विद्याशाखा, डॉ. साहेबराव भुकन यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यास्तव केलेल्या विनंतीनुसार स्नातकांना पदवी प्रदान केल्या. कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी यांनी स्नातकांना उपदेश केला.
समारंभात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी व प्रा. गणेशन कन्नबीरन यांच्या हस्ते सुवर्णपदके वितरित करण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील यांनी घोषित केली. आजच्या समारंभाचे वैशिष्ट्य असे की, १३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ सुवर्णपदके, ४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ सुवर्णपदके, एका विद्यार्थ्याला ४ सुवर्णपदके मिळाली. सुवर्णपदके विद्यार्थ्यांना प्रदान करीत असतांना त्यांचे पालक तसेच यावेळी प्रथमच देणगीदारांचे प्रतिनिधी यांनाही मंचावर बोलविण्यात आले होते. समारंभात अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य तसेच विविध अधिकार मंडळाचे सदस्य, प्राचार्य, संस्थाचालक, देणगीदार, विद्यार्थी, पालक, नागरिक उपस्थित होते. विद्यापीठाच्या कलावंतानी ‘बलसागर भारत होवो’ गीत सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन डॉ. रफिक शेख, खेमचंद पाटील, डॉ. विना महाजन यांनी केले.
समारंभात २९ हजार ९७ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली असून यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १२ हजार २५९ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४ हजार ५९९ स्नातक, मानवविज्ञान विद्याशाखेचे ६ हजार ४१९ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे २ हजार २६० स्नातकांचा समावेश आहे. त्यात स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २८७, मुळजी जेठा महाविद्यालयाचे १ हजार २७१, प्रताप महाविद्यालयाचे ८५२, जी.एच.रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ९६३, व आर. सी. पटेल इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, शिरपूरचे १८७ अशा ३ हजार ५६० विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली. गुणवत्ता यादीतील १२० विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले. यामध्ये ८८ मुले व ३२ मुलींचा समावेश आहे. तसेच एक सुवर्णपदक समान गुणांमुळे दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले. समारंभात १९५ पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांनी पदवी घेतली.
केसीआयआयएलचा स्टार्टअप एक्स्पो
विद्यापीठाच्या नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळाच्या केसीआयआयएल सेक्शन ८ कंपनीद्वारा स्टार्टअपला सहकार्य केलेल्या व प्रत्यक्ष उत्पादन सुरु झालेल्या १४ स्टार्टअपचे प्रदर्शन दीक्षांत सभागृहासमोर लावण्यात आले होते. त्यावेळी प्रा. गणेशन कन्नबीरन व कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी प्रदर्शनाला भेट दिली. प्रा. गणेशन यांनी उपक्रमाचे कौतुक करीत स्टार्टअप उद्योजक यांना महत्वपूर्ण टीप्स दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे, रोशनी जैन, संचालक डॉ. राजेश जवळेकर उपस्थित होते.
